नागपूर :- राज्यात सत्ता सर्वतोपरी मानून जे काही सुरू आहे ते कधीही महाराष्ट्रात बघितले नाही. काही लोक सत्तेविना राहू शकत नाहीत. सत्तेला कुठल्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. अजित पवार जाणार अशी चर्चा होतीच ,खरंतर आता महाराष्ट्रात पुस्तक लिहिण्याची गरज आहे की, पक्ष कसा फोडायचा ? अशी प्रतिक्रिया माजी मंत्री काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
वडेट्टीवार म्हणाले, प्रत्येकाला पक्ष चालवत असताना अडचणी असतात. पक्षातील काही लोक समाधानी नसतात. आजही तेच घडले आहे. पक्षप्रमुख पक्ष सांभाळण्याचे काम करतात. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच ईडीचे हे सरकार असे बोलले जायचे. आता ईडीअ (एकनाथ, देवेंद्र, अजित) म्हणण्याची वेळ आलेली आहे. केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून वाटेल त्या पद्धतीने सत्ता मिळवणे आणि टिकवणे हेच राज्यात सुरू आहे.महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची पातळी सोडण्याचे काम सध्या सुरू आहे. कोणालाही समाधान मिळालं असलं तरी महाराष्ट्रातील जनतेला यातून निश्चितच समाधान मिळणार नाही. अशा राजकारणाला जनता काय धडा शिकवेल ? हे येणारा काळच सांगेल.