
पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी २८० कोटींचीच तरतूद प्रस्तावित केली आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा परिवहनच्या तोंडाला पानेच पुसल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिवहनच्या तोंडाला पाने पुसली…
ठाणे परिवहन सेवेने यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेकडून ५७१ कोटी ३३ लाख रुपये अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून शहरातील विकासकामे अनुदान आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून सुरू आहेत. त्यामुळे पालिका एवढे अनुदान परिवहनला देणार का? याबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. अशातच पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी २८० कोटींचीच तरतूद प्रस्तावित केली आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा परिवहनच्या तोंडाला पानेच पुसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपेक्षेप्रमाणेच मार्च महिन्याच्या पाहिल्या आठवड्यात ठाणे महानगरपालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सरकारी अनुदानाच्या शिडीवर फुगलेला आणि कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला असला तरी खर्च आणि उत्पन्न यांच्यातील सुवर्णमध्य साधताना प्रशासनाची तारांबळ उडणार आहे.
महापालिका निवडणुकांबाबत असलेली अनिश्चितता यामुळे निश्चित काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे या अंदाजपत्रकामुळे स्पष्ट होत आहे. पालिका प्रशासनाने मांडलेल्या या अर्थसंकल्पात महापालिकेचे आगामी दिशा, नवीन प्रकल्प त्याचप्रमाणे भविष्यातील ठाणे याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत असून महापालिकेची आर्थिक क्षमता माफक असताना ठाणेकरांचा हॅप्पी इंडेक्स वाढणार कसा? हा प्रश्न देखील यामुळे निर्माण होत आहे. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट होत असताना भविष्यात नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले नाही तर भविष्यात आर्थिक आणीबाणीला तोड द्यावे लागेल, हा धडा या अर्थसंकल्पातून प्रशासनाला मिळाला असून कठोर आर्थिक शिस्त आणि काटकसर करूनच पुढील वाटचाल करण्याचे आवाहन पालिकेपुढे आहे.
महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख तीन खांब असलेले मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि शहर विकास विभाग यंदा अपेक्षित महसूल गोळा करण्यात अयशस्वी ठरले असल्याने महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून २०२४-२५ मध्ये ८१९.७१ रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना डिसेंबर अखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५१२.४२ कोटी जमा झाले आहेत.
शहर विकास विभागाला ७५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असताना डिसेंबर अखेर ३८५ कोटी नऊ लाखांपर्यंत मजल मारली. त्याच प्रमाणे पाणीपुरवठा विभागास २२५ कोटींचे उत्पन्न उद्दिष्ट देण्यात आले असताना पाणीपट्टी विभाग १०० कोटींचे उत्पन्न देण्यात यशस्वी ठरला आहे.
पालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने अपेक्षेप्रमाणेच कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ न करता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २०२५- २६ चा ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महापालिकेवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्याने हाती घेण्यात येणारे प्रकल्प ही खासगी लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प हा काटकसरीचा आणि वास्तवदर्शी अर्थसंकल्प आहे.
अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ दिसून आली आहे.भांडवली खर्चापेक्षा महसूल खर्च अधिक असून महसुली खर्च हा ३७२२ कोटी ९३ लाख तर भांडवली खर्च हा १९२१ कोटी ४१ लाख असल्याचे यावर्षीच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.
मागील काही वर्षांचा ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प बघितला तर अनेक कोटींची उड्डाणे घेत असलेला दिसत होता. अवास्तव अधिक रकमा प्रकल्पा साठी प्रस्तावित करून अर्थसंकल्पाची उंची वाढवण्यात येत असल्याची दिसत होते.
मात्र यंदाच्या प्रशासनाने वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर केल्याने आकड्यांची आलेली सूज कमी झाली असल्याचे दिसत आहे. भविष्यातील ठाणे शहरातील ठाणेकर नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले प्रकल्प कसे मार्गी लागणार आणि काटकसर करून त्याची अंमलबजावणी कशी करणार? हा अवघड प्रश्न प्रशासनासमोर आहे.