कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जागतिक युवा कौशल्य दिन,कृत्रिम बुध्दीमत्तेला मित्र बनवून कौशल्य विकसित करा – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते…

Spread the love

रत्नागिरी : नैसर्गिक बुध्दीमत्तेने जरी कृत्रिम बुध्दीमत्तेला जन्म दिला असला तरी, त्याला सूचना देऊन आपल्याला हवे असणारे काम झटकन उरकता येते. सरावाने, सृजनशीलतेने स्वतःमधील कौशल्य अधिक विकसित करा. कृत्रिम बुध्दीमत्तेला आपला स्मार्ट मित्र बनवा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
             

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने ‘कृत्रिम बुध्दीमत्ता डिजीटल कौशल्याद्वारे युवा सक्षमीकरण’ विषयावर ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आनंद देसाई, जिजाऊ सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड  महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, सचिव केदार चव्हाण, डॉ. गिरीश पिंगळे, वाल्मिक बिलसोरे, रमजान शेख आदी उपस्थित होते. 


            

कृत्रिम बुध्दीमत्ता आणि डिजीटल कौशल्याचा वापर करुन आपल्या उत्पादनांची निर्मिती, तिचा प्रसार आणि विक्री करण्यास मदतच होणार आहे. असे सांगून श्री. सातपुते म्हणाले, प्रत्येक माणसामध्ये असणारी कला कौशल्याच्या जोरावर विकसित झाली पाहिजे. कलाकराला मरण असले, तरी कलेला आयुष्य असते. तिच्या जोरावर कलाकार जिवंत राहत असतो. कृत्रिम बुध्दीमत्तेला सोबती बनवा. त्याच्या जोरावर क्षणार्धात काम उरकता येते. उत्पादित मालाच्या प्रचारासाठी प्रभावीपणे वापरता येते. सृजनशीलता जपायची असेल, तर सरावाला महत्त्व द्या. यावेळी त्यांनी काही प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखवून दिले.


           

श्रीमती शेख यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगून त्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्र संघाने 15 जलै 2014 रोजी  जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून 15 जुलै निश्चित केला. देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल, देशाला विकसित करायचे असेल, तर युवा प्रशिक्षणार्थींमधील कौशल्य वाढीस लागले पाहिजे. त्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्याच्या जोरावर व्यवसाय रोजगार करण्यास त्यांना निश्चितच मदत होते. श्री. देसाई, ॲड मांडवकर यांनीही मार्गदर्शन केले.
     

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सिध्देश पालांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करुन राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    

महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलची यावेळी उपस्थितांनी पहाणी केली.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page