मुंबई गोवा हायवे मध्ये आरवली ते तळेज कंटे दरम्यान अपघातांची शृंखला चालूच…
संगमेश्वर /प्रतिनिधी- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील तुरळ येथे गोवा च्या दिशेहून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी आराम बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन डंपरला जोराची धडक दिली.या झालेल्या अपघातात बस चालक तसेच बस मधील दोघे असे तिघेजण जखमी झाले असून, झालेल्या तिहेरी अपघातात तिन्ही गाड्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात काल. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास झाला .
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गचे तुरळ या ठिकाणी काम सुरु असून जे. एम. म्हात्रे कंपनीच्या MH 46 BB/6723 डंपर गाडीने सूरू असलेल्या कामाचे काँक्रेट माल कोळंबे येथून तुरळ येथे घेऊन चालक आकाश रामप्यारे हा जात असताना व त्याला या ठिकाणी आल्यावर काम सुरु असलेल्या उजव्या बाजूला जायचे असल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना सूचना म्हणुन देण्यासाठी दिशादर्शक इंडिकेटर लाईट देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून गोवा च्या दिशेहून भरधाव वेगात खाजगी आराम बस गाडी क्रमांक GA/07/T/1264 घेऊन येणारा चालक लक्ष्मण भिवा कळचावकर (राहणार. शिरोडा,जिल्हा, सिंधुदुर्ग)येत असताना त्याचा बस वरील ताबा सुटल्याने डंपर च्या पाठीमागे हौद्याला पाठीमागून घासत जाऊन कॅबिनला जोरदार धडक देत रस्ता सोडून खाली जात रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या MH/AF/46/9666 या डंपरला जोरदार अशी धडक दिली.
सुसाट वेगात येणाऱ्या बसची दोन्ही डंपरला बसलेली धडक एवढी जबरदस्त होती की या धडकेत दोन्ही डंपरचे तसेच ट्रॅव्हल्स चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघातात ट्रॅव्हल्स चालक लक्षण भिवा कळचावकर (रा. शिरोडा मु. पोस्ट वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग ), संतोष श्रीधर जाधव (रा. मानखुर्द, मुंबई ),शंभू रंजन दालपती रा. परेल )हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती डंपर चालक आकाश रामप्यारे यांनी संगमेश्वर पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस हेडकॉंस्टेबल सचिन कामेरकर आदी पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला.व रखडलेली वाहतूक सुरळीत केली.तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे करत आहेत.