चिपळूण : यावर्षीचा अर्थसंकल्प म्हणजे जनतेला पळीतून पंचामृत, एकनाथ शिंदे यांना प्रसाद आणि स्वत:ला महाप्रसाद अशी भाजपची भूमिका आहे, अशी टीका उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.आपल्याला सभागृहात बोलूच दिले जात नाही. संधी मिळाली तर वाक्य पूर्ण करुन देत नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असे असते. बाहेर बोलताना ते एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा बोलतात. पण बैठकीतील चर्चेत मात्र ते खरे बोलले. ४८-५० जागा ते शिंदे यांना देतील आणि २४० जागा स्वत: लढवतील. पण शिंदे यांना दिलेल्या जागांपैकी पाडणार किती ते खासगीत सांगतील. जाहीरपणे सांगणार नाहीत असा टोलाही लगावला
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. राज्याचे उत्पन्न किती होईल, खर्च किती होतील, तूट किती येईल, याची आकडेवारीही सांगितली गेली नाही. तुमचं तुम्हीच काय ते ठरवा. असा अर्थसंकल्प यापूर्वी कोणीच मांडलेला नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना नेते रामदास कदम यांचा अर्थतज्ज्ञ असा उल्लेख करुन भास्कर जाधव यांनी त्यांच्यावरही टीका केली. आधीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने स्वत:ला ५७ टक्के, काँग्रेसला ४३ टक्के आणि शिवसेनेला १६ टक्के मिळाले, असा ११६ टक्क्यांचा हिशोब रामदास कदम मांडतात. पण आताच्या अर्थसंकल्पात तर ८७.५ टक्के रक्कम भाजपने आपल्याला घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला साडेअकरा टक्केच रक्कम दिली. आता तोंड कोण उघडणार, असा प्रश्नही त्यांनी केला.