यंदाही साळोख धरणाचे पाणी शेतीला नाही, पाणी नसल्याने पिके सुकली, धरण क्षेत्रातील पाण्याचे पाईप फुटल्याचे कारण पुढे, तर गेले तीन वर्ष शासनाकडून धरणाची दुरुस्ती रखडली ?

Spread the love

नेरळ: सुमित क्षीरसागर

भाताचे कोठार असलेला कर्जत तालुका आपली हि ओळख पुसत होत असतानाही शेती टिकवून आहे. हि ओळख टीकवून राहावी याकरता तालुक्यात काही भागात दुबार शेती केली जाते तर भाजीपाला देखील पिकवला जातो. पावसाळ्यानंतर शेतीला पाणी मिळावे यासाठी पाझर तलाव धरण आदींची व्यवस्था शासनाकडून तालुक्यात करण्यात आली आहे. मात्र आता खुद्द शासनकडूनच या धरणांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याने शेतीपर्यंत धरणाचे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे पिके सुकून जात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर जलसंधारण विभाग थेट शासनाकडे बोट दाखवत असल्याने शेतकऱ्याने मदत मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून देखील ओळखला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर दुर्गम भाग आहे. त्यामुळे येथे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न कायम गंभीर बनतो, माणसांना, गुरांना, पाण्यासाठी उन्हाळ्यात उन्हासोबत पाणीटंचाईच्या झळा सोसत मैलोनमैल पायपीट करावी लागते. तर तिथे शेतीला पाणी कसे मिळायचे असा प्रश्न असल्याने शासनाने जल नियोजन धोरण आखात तालुक्यात पाझर तलाव, धरण आदींची निर्मिती केली. त्यातील एक धरण म्हणजे साळोख तर्फे वरेडी. या धरणातील पाणी साठा हा मृत अवस्थेत असला तरी त्यातील पाझरून जाणाऱ्या पाण्यावर परिसरात पिके आणि भातशेती केली जाते. तर गुरांना देखील पावसाळ्यापर्यंत पाणी साठा उपलब्ध राहतो.

तर धरणातून पाईप काढत त्यातून परिसरातील जमीन ओलिताखाली आणली गेली होती. मात्र गेली ३ वर्षे या धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही परिणामी परिसरातील शेतीला पाणीच मिळाले नाही. त्यामुळे परिसरात होणारी शेती सुकून गेली आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील घटले आहे. तेव्हा धारण उशाशी असून त्याचा उपयोग काय अशी ओरड शेतकरी करत आहेत. दरम्यान याबाबत प्रशासनाशी चर्चा केली असता येथील धरणातून पाइपद्वारे पाणी पुढे सोडले जाते मात्र पाईप फुटल्याने बाजूच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते त्यामुळे ते शेतकरी ओरडतात. त्यामुळे आम्हीच पाणी सोडत नाही असे उत्तर देत शासनाला दुरुस्तीसाठी अहवाल सादर केल्याचे संगत जलसंधारण विभागाने थेट हातच वर केले आहेत. त्यामुळे आता शासन या दुरुस्तीकडे लक्ष देणार कधी आणि शेतीला पाणी मिळणार कधी या गोष्टीला प्रतिक्षेची किनार आहे. मात्र गेली ३ वर्षे पाण्याअभावी येथील नालेही सुकले आणि शेतीही असे भयावह चित्र या परिसरात आहे.

साळोख धरणातून पुढे पाइपद्वारे पाणी शेतीसाठीसोडले जाते. मात्र पाईप फुटल्याने हे पाणी आजूबाजूच्या शेतीत शिरते त्यामुळे येथील शेतकरी ओरडतात. मात्र पुढील शेतकरी हे पाण्यासाठी मागणी करतात. पाईप दुरुस्तीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. निधी उपलब्ध झाल्यावर काम पूर्ण करून पाणी शेतीसाठी सोडले जाईल.
: भरत गुंटूरकर, उपअभियंता उपविभाग पाटबंधारे, जलसंधारण विभाग

गेली ३ वर्षे साळोख धरणातून पाणी सोडले नसल्याने पावसाळ्यात लावलेल्या पिकातून आता उत्पन्न कमी मिळाले आहे. तर माझ्या शेतातील दुधी भोपळा, गवार, कोहळा चवळी अशी पिके सुकून गेली आहेत. ३ वर्ष पाण्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत मात्र प्रत्येक वेळी दुरुस्तीचे बहाणे पाटबांधारे विभाग सांगत असते. हि दुरुस्ती होणार तरी कधी ?
: अरुण वेहले, शेतकरी माले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page