
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यानंतर त्यांनी आजवर अनेकदा अमेरिका दौरा केला आहे. अमेरिकेत ट्रम्प यांची सत्ता जाऊन जो बायडेन अध्यक्ष झाले तरीही अमेरिकेशी भारताचे असलेले संबंध सलोख्याचेच राहिले. पंतप्रधान मोदी आजपासून पुन्हा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.
अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी २० ते २४ जून या कालावधीत अमेरिकेत असणार आहेत. या दौऱ्यात अमेरिकेच्या संसदेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषणाची संधी मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला दौऱ्यावर गेले आहेत. २२ जून रोजी अमेरिकेत मोदींसाठी सरकारी स्नेह भोजनही आयोजित करण्यात आलं आहे.
मोदींच्या दौऱ्यात काय काय?
२२ जून रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं स्वागत केलं जाईल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आणि त्यानंतर स्नेह भोजन होईल
२३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेत भाषण करतील
आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय नेत्यांसह तिथले सीईओ, उद्योगपती आणि अनिवासी भारतीय यांचीही भेट घेणार आहेत.
अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तला जाणार आहेत
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी मोदी अमेरिकेत
या दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत असणार आहेत. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय. त्याच संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होईल.