
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापुर तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत. याबाबत आपली नेमकी भूमिका काय असे राष्ट्रवादीचे (अजितदादा गट ) प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विचारता ते म्हणाले, एखादा प्रकल्प राज्याच्या ,देशाच्या हिताचा असतो त्यावेळी त्यात राजकारण आणले जाऊ नये. लोकांचे हित जपले जायला हवे. त्यासाठी त्या प्रकल्पाची किती गरज आहे, त्याचे लाभ काय आहेत, किती रोजगार त्यातून मिळणारं आहेत, प्रकल्पाच्या बर्या वाईट बाबी लोकांना समजावून सांगायला हव्यात. लोकांच्या शंकांचे निरसन करायला हवे. परंतु हेच राजापूरच्या रिफायनरी बाबत घडले नाही, त्यामुळेच रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला, असे तटकरे म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आले असता सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमंशी संवाद साधला.

एका प्रश्नाच्या उत्तरात तटकरे म्हणाले, उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा उत्तर भारतीयांचा मेळावा घेत आहेत, ही बाब त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना पावसाळ्यानंतर सभा, बैठका सुरू करेल. ठाकरे शिवसेना उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन घेतले होते. यात पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या भाषणात पक्षाची ध्येयधोरणे मांडली आहेत. त्यानुसारच पक्षाची भूमिका असेल असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का?
राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. काळ हेच त्याचे उत्तर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला काम करता आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. याबाबत आपले मत कायावर विचारता तटकरे म्हणाले की, अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांचे योगदान खूप मोठे आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ते मंत्रालयात कामकरत असत. त्यांची कार्यक्षमता अफाट आहे. पण त्यांच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला गेला नाही, असेही तटकरे म्हणाले.