
चिपळूण- गेल्या तीन दिवसांपासून येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या वातावरणाचा फायदा उठवत चिपळूण शहरातील राधाकृष्णनगर परिसरातील तब्बल ९ सदनिका चोरट्याने फोडल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. बंद स्थितीत असलेल्या सदनिका फोडल्या असल्या, तरी त्यातील तीन सदनिकांमधूनच मुद्देमाल चोरीला गेला आहे.
महिनाभरापूर्वी बाजारपेठेतील कोकण बाजार व अन्य दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. त्यातील चोरट्यांचे फुटेज पोलिसांच्या हाती मिळाले होते. त्यानुसार अजूनही त्यांचा शोध घेतला जात आहे, मात्र त्यानंतर शहरातील चोरीच्या घटना थांबल्या होत्या. सलग तीन दिवस येथे जोरदार पाऊस सुरू आहे. त्याशिवाय शहरातील अनेक कुटुबे ऊन्हाळी सुट्टीच्या निमीत्ताने परगावी गेले आहे. त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी पुन्हा एकदा चोरीचे सत्र सुरू केले आहे. शहरातील राधाकृष्ण नगर परिसरातील ९ सदनिका फोडून चोरट्यांनी पोलिसांनाच गुंगारा दिला आहे.
राधाकृष्ण नगर येथील सोहम अपार्टमेंटमधील दोन सदनिका, श्रावणधारामधील पाच, साईविहारमधील एक व गुरूकृपामधील एक अशा एकूण ९ सदनिका फोडल्या आहेत. यातील लोंढे यांच्या सदनिकेमधील दागिने व अन्य मुद्देमाल चोरीला गेला असून याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया रात्री सुरू होती, तसेच धर्मे व नायर यांच्या सदनिकेतूनही मुद्देमाल चोरीला गेला असून ते कराड व केरळ येथे गेल्याने अद्याप त्याबाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही. याव्यतिरीक्त अन्य घरफोड्या झाल्या असल्या तरी तेथून फारसे चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. काही महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली असल्याची माहिती मिळत आहे.