अफगाणिस्तानवर वरचढ ठरले टीम इंडियाचे ‘हे’ 5 खेळाडू, भारताच्या विजयाचे ठरले शिल्पकार…

Spread the love

*भारतीय संघानं टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्ये विजयानं सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं गुरुवारी सुपर-8 मधील पहिला क्रिकेटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 47 धावांनी जिंकला.*

*ब्रिजटाऊन :* भारतीय संघानं आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघानं अफगाणिस्तानवर 47 धावांनी क्रिकेट सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारतानं अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 134 धावांवर ऑलआऊट झाला.

दोन्ही संघांचा सुपर-8 फेरीतील हा पहिलाच सामना होता. आता भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध 22 जूनला आपला पुढचा सामना खेळायचा आहे. हा सामना अँटिग्वा येथं होणार आहे. तर अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर झाला.

*सूर्याचं सलग दुसरे अर्धशतक, पांड्याही चमकला :* या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघानं 11 धावांवर रोहित शर्माच्या (8) रुपानं पहिली विकेट गमावली. यानंतर ऋषभ पंत (20) आणि विराट कोहली (24) यांनी खेळ सावरला. मात्र 19 धावांत 4 गडी गमावल्यानं पुन्हा एकदा संघ अडचणीत दिसत होता. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यानं 37 चेंडूत 60 धावांची भागीदारी करत डाव सावरला. सूर्यानं 27 चेंडूत सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. तो 28 चेंडूत 53 धावा करुन बाद झाला. सूर्यानं आपल्या खेळीत 3 षटकार आणि 5 चौकार लगावले. तर पांड्यानं 24 चेंडूत 32 धावा केल्या. त्यानं 2 षटकार आणि 3 चौकार मारले. या खेळीमुळं भारतीय संघानं 8 गडी गमावून 181 धावा केल्या. दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी कर्णधार राशिद खान आणि फजलहक फारुकी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर नवीन उल हकला 1 विकेट मिळाली.

*अफगाणिस्तानची खराब फलंदाजी :* प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 134 धावांत ऑलआऊट झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं सर्वाधिक 26 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. तर भारतीय संघाकडून बुमराह आणि अर्शदीप सिंगनं 3-3 विकेट घेतल्या. कुलदीप यादवला 2 विकेट मिळाल्या. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page