महायुतीत अद्यापही रस्सीखेच; पालघर मतदारसंघाबाबत संभ्रम कायम, गावित यांना स्थानिकांचा वाढता विरोध….

Spread the love

पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी राजेंद्र गावित यांनाच मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले असले, तरी तरीसुद्धा पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, असा भाजपचा प्रयत्न आहे.

महायुतीत अद्यापही रस्सीखेच; पालघर मतदारसंघाबाबत संभ्रम कायम, गावित यांना स्थानिकांचा वाढता विरोध

पालघर- लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षातील जागावाटप निश्चित झाले नसल्याने जागावाटपाचा संभ्रम कायम राहिला असून त्यामुळे उमेदवारीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री शिंदे गटाला लोकसभेच्या दहा ते बाराच्या आसपास जागा देण्याचे मान्य केल्याने त्यांच्या कुठल्या जागा भाजपकडे जातात आणि त्यात पालघरचा समावेश आहे का, याबाबत अजून गूढ कायम आहे.

विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी वेगवेगळ्या संघटना गळे काढू लागले आहेत. मात्र राजकारणात मात्तबर असलेले राजेंद्र गावित या परिस्थितीला कसे तोंड देतात हे पाहायला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी राजेंद्र गावित यांनाच मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले असले, तरी तरीसुद्धा पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने त्यांची उमेदवारी बदलावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे पालघरची जागा जरी शिवसेनेकडे राहिली, तरी गावित यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी उमेदवारी द्यावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी काही जणांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने या आघाडीचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून, हितेंद्र ठाकूर यांची ताकद आहे. या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सुटतो, यावर निवडणुकीची राजकीय गणिते अवलंबून आहेत. बहुजन, विकास आघाडी, शिवसेना भाजप आणि काँग्रेस अशा प्रमुख राजकीय पक्षांचे अस्तित्व असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होईल असे चिन्ह आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सध्या त्यातल्या तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य आहे, तर राहिलेल्या तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट या तीन पक्षाचे आमदार आहेत. विधानसभा जागांच्या पातळीवरील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व नसले, तरी लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपचे वर्चस्व असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. या लोकसभा निवडणुकीत वेठबिगारी, आदिवासींच्या समस्यांचे निराकरण, आरोग्यापासून शिक्षणापर्यंतच्या समस्या, वाढवण बंदराचा मुद्दा, भूसंपादन आणि पुनर्वसन, नागरी सुविधांचे प्रश्न, वीज आणि अतिक्रमणे आदी समस्या येथे आहेत.

भाजप पालघरसाठी आग्रही…

या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीची अदलाबदल होणार, की गावित पुन्हा धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार हा अद्याप प्रश्न कायम आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत पालघर मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी गणिते पक्षाकडून मांडली जात आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर खा. गावित यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये, यासाठी शक्ती प्रदर्शन आणि नारेबाजी जोरदार सुरू आहे.

‘ही’ नावे चर्चेत…

भाजपकडून आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री कै. विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा, भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले विलास तरे, अमित घोडा यांची नावे चर्चेत आहेत. या लोकसभा मतदारसंघात सुमारे आठ लाख मतदार वाढले असून त्यात बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार सर्वाधिक आहेत.

वाढवण बंदराबाबतची नाराजी भोवणार…

वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. वाढवण बंदराविरोधात स्थानिक एकवटले असून त्याचा फटका या निवडणुकीत बसू शकतो. मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक गावकऱ्यांचा या बंदराला विरोध आहे. धाकटी डहाणू येथे तर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page