
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आज सोमवार दि.१४ रोजी असगणी गावात मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. शेकडो ग्रामस्थ घोषणा देत रस्त्यावर उतरले आणि कोको कोला कंपनीविरोधात त्यांनी लोटे औद्योगिक वसाहतून मोर्चा काढला.

हा मोर्चा असगणी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होऊन औद्योगिक क्षेत्रातून फेरफटका मारत पुन्हा ग्रामपंचायतीसमोर येऊन संपला. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली असगणी ग्रामस्थानी मोर्चा काढला होता .भूमिपुत्रांना न्याय न दिल्यास आंदोलन उग्र रूप धारण करेल असा
इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थानी दिला आहे. आंदोलनात ग्रामस्थांनी प्रकल्पातील नोकरभरती प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या दिल्या जात असल्याची आमची स्पष्ट नाराजी आहे,” असे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कोकणातील हा एक मोठा औद्योगिक प्रकल्प असल्याने स्थानिकांमध्ये रोजगाराच्या संधीबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची भावना निर्माण झाली असून, येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर