आधीच अनेक शाळांवर एकच शिक्षक,त्यात शिक्षकांच्या झालेल्या बदल्या,ग्रामीण शाळांच्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नका!
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रत्नागिरी:- जिल्ह्यात गावखेड्यातील अनेक शाळांवर एकच शिक्षक आहेत,आधीच पटसंख्या हा चिंतेचा विषय आहे त्यात जिल्हा परिषद शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त केल्यास आमच्या ग्रामीण मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो ,परिणामी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अन्य निवडणुकांचे काम देऊ नका अशी विनंती गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात खंडागळे यांनी म्हटले आहे की,कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती ही दुर्गम असल्याचे आपण जाणता.
या दुर्गम भागात वाडी वस्त्यांवर असणाऱ्या शाळामधील कमी पटसंख्या हा आधीच चिंतेचा विषय असताना ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त केल्याने सर्वाधिक नुकसान हे आमच्या ग्रामीण भागातील मुलांचे होणार आहे.
शासनाच्या दृष्टीने मराठी शाळांचे शिक्षक हे कदाचित सरकारी कर्मचारी असतील परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते त्यांचे भविष्य घडविणारे मार्गदर्शक आहेत.
आधीच जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील शाळांवर एकच शिक्षक असण्याचे प्रमाण जास्त आहे.नुकत्याच सुमारे 750 शिक्षकांच्या बदल्या प्रशासनाने एकाच वेळी जिल्ह्या बाहेर केलेल्या आहेत.त्यात आता आहेत त्या शिक्षकांना अनेक ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे निवडणुकीचे काम दिल्याने ग्रामीण शाळांच्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण?असा प्रश्न गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.
एकच शिक्षक असणाऱ्या शाळातील शिक्षक शैक्षणिक काम सोडून अन्य काम करू लागले तर ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता कशी सांभाळली जाणार?असाही प्रश्न खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना शैक्षणिक कामा व्यतिरिक्त अन्य कामे देऊ नयेत….मतदान केंद्र स्तरीय अधिकारी या कामासाठी आपण अन्य मनुष्यबळ उपयोगात आणावे.हवे तर त्या त्या गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुण मानधन तत्वावर नियुक्त करावेत.गावखेड्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्यावी अशी विनंती सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये केली आहे.
जाहिरात