सातारा : छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल मोबाईलवर आक्षेपार्ह भाषेतील स्टेटस ठेवल्याचे कृत्य लांच्छनास्पद आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे मोठे कट-कारस्थान या घटनेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून तेढ निर्माण करणारी प्रवृत्ती ठेचून काढा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
धमकी आलेल्यांना संरक्षण नाही : या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी विस्तृत खुलासा करावा. संशयित मुलाच्या घराला पोलिसांनी संरक्षण दिले, परंतु धमकीचे मेसेज आलेल्यांना कसलेही संरक्षण दिलेले नाही, हा मोठा विरोधाभास असल्याचे उदयनराजेंनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.
अपप्रवृत्ती ठेचून काढा :समाज स्वास्थ्याला धक्का लागू नये, यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोतच. तथापि, अशी अपप्रवृत्ती प्रशासनाने वेळीच ठेचून काढली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी जमलेल्यांपैकी काही जणांना पाकिस्तानामधून धमकीचे मेसेज आले. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही लागेबांधे आहेत का? याचाही तपास करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहीजेत, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.
जाहिरात