सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना केली होती. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिरसाट हे सरकारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे का? असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील, तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली..