देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे होतेय सर्वत्र कौतुक…
देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजिकच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणास देवरुख पोलिसांनी आंबा येथून मंगळवारी अटक केली आहे. गणेश आनंदा जाधव (वय-२४ र. केर्ले, ता. शाहूवाडी. जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला देवरुख न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख नजिकच्या एका गावातील अल्पवयीन मुलीची व गणेश जाधव या तरुणाची देवरुख बसस्थानक येथे भेट झाली होती. यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याने तीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. आपली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तीला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा. दं. वि. १३७ (२), ८७ कलमान्वये दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिसांनी माहिती घेतली असता त्याचे नाव गणेश जाधव असल्याचे समजले. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
अखेर तो आंबा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, हे. कॉ. प्रशांत मसुरकर, हे. कॉ. सागर मुरुडकर, हे. कॉ. सचिन पवार, पो. हवालदार अभिषेक वेलवणकर यांना मंगळवारी सकाळी १० वा. घेऊन आंबा गाठले. यावेळी गणेश हा या मुलीसोबत एका पडक्या घरात असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन देवरुख येथे आणले. व मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले. तर गणेश जाधव याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.