
देवरूख- रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील तळ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या देवरूख येथील १७ वर्षीय आदेश दत्ताराम घडशी या तरूणाचा सोमदेव तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने देवरूखवासियांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवरुख येथील रहिवासी व स्थानिक महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला आदेश नुकताच बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. परीक्षेनंतर सुट्टीच्या काळात तो रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे आपल्या मित्रांसोबत गेला होता. तिथे सोमदेव मंदिराजवळील अंदाजे १५ ते १६ फूट खोल तळ्यात उडी मारल्यानंतर तो पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे गटांगळ्या खाऊन बुडाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून आदेशला पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा श्वास थांबलेला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर आदेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे देवरुख परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने देवरूखमध्ये शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.