रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात पर्यायी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम आता पूर्णत्वाकडे आले असून, लवकरच भुयारी मार्ग सुरू हाेण्याचे संकेत बांधकाम विभागाकडून मिळत आहेत.महामार्गावरील चाैपदरीकरणाच्या कामात कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग काढण्यात आला. सह्याद्रीचा कातळ फोडून दोन भुयारांमध्ये प्रत्येकी तीन पदरी दोन मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय ठरणार आहे. घाटातील खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत आणि पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे दुहेरी भुयारीमार्ग पूर्णत्वास गेले आहेत.आतील रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच भुयाराचे काँक्रीटचे पिचिंगचे कामही आता वेगाने सुरू आहे. भुयारापर्यंत दोन्ही बाजूने जोडणारा ॲप्रोच रोडचे काम सुरू झाले आहे. या ॲप्रोच रस्त्यावरील तीन पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही भुयारी मार्ग या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहेत. त्यानंतर भुयारी मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.