चिपळूण : मुंबई-गोवा येथील राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील कामथे ते खेरशत या ३० किमी. अंतराच्या टप्प्यातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सावर्डे बाजारपेठेत उड्डाणपूल की भराव ब्रिज यामुळे हे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. अखेर ग्रामस्थांच्या संमतीने हे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झाले असले तरी हे काम मंदगतीने सुरू असल्याने येथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सावर्डे ते आगवे व खेरशत ते आरवली हद्दीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामथे ते खेरशत उर्वरित ३० किमी अंतराचे काम पूर्ण झाल्याने खेरशत ते चिपळूण हा प्रवास पावसाळ्यापूर्वी पूर्ववत विनाअडथळे सुरू होणार आहे. या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील शहरातील व छोट्या बाजारेपठेच्या ठिकाणातील अनेक तरुणांना स्वतःचा उद्योग जागेअभावी बंद करावा लागल्याने बेरोजगार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सावर्डे येथील बाजारपेठ येथील काम भराव ब्रिज की उड्डाणपूल या भोवऱ्यात अडकले होते. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने उड्डाणपूल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी व व्यापारी संघटनेने आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले; मात्र ते असफल झाले. आमदार निकम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून भरावपूलही रद्द करून येथील बाजारपेठेचे अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळवले. त्यामुळे छोटे-मोठ्या उद्योग व्यावसायिकांना आधार मिळाला.