मुंबई:- पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनच्या कामाला आता वेग येणार आहे. रेल्वेसाठी देशातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे बांधकाम सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
हा बोगदा २१ किलोमीटर लांबीचा असेल, विशेष म्हणजे सात किलोमीटरचा हा बोगदा समुद्राखाली बांधण्यात येणार असून, मुंबईत हा बोगदा बांधण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुरू होणार आहे. येथे संपूर्ण स्टेशन आणि ट्रॅक दोन्ही भूमिगत असतील. येथून एक बोगदा तयार केला जाईल, जो समुद्राखालून जाईल. हा बोगदा बांधणे हे एक आव्हानच असणार आहे, कारण सात किलोमीटर लांबीचा हा बोगदा समुद्राखालून जाणार आहे. आता त्याचे बांधकाम सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम सुरू होईल. त्यामुळे मार्च २०२४ पासून बोगद्यासाठी खोदकाम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी आधीच टेंडर काढण्यात आले आहेत.
पहिल्यांदाच समुद्राखाली बोगदा बांधला जात आहे.
देशात प्रथमच समुद्राखाली बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे असे कोणतेही टनेल बोअरिंग मशिन अद्याप उपलब्ध नसून, आता वेगवेगळ्या देशांतून टीबीएमचे पार्ट्स आणले जात असून ते येथे असेंबल केले जाणार आहेत. त्यानंतर खोदकाम सुरू होईल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन ते तीन महिन्यांत टीबीएम असेंबल केले जाईल. हा बोगदा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स भूमिगत स्टेशन ते शिळफाटा या दरम्यान असेल.
मेट्रो आणि हा बोगदा यातील फरक.
देशातील अनेक शहरांमध्ये भूमिगत मेट्रो सुरू आहेत. त्यासाठी बोगदेही बांधण्यात आले, पण पाण्याखाली एकही बोगदा बांधण्यात आलेला नाही. कोलकात्यात हुबळीखाली बोगदा असला तरी तो फक्त ५२० मीटर लांब आहे. समुद्राखाली असे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे हा बोगदा मेट्रोपेक्षा अतिशय वेगळा आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी बोगदा बांधण्यासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एनएटीएम ) वापरली जाईल. हे तंत्रज्ञान परदेशात यशस्वी आहे.
बुलेट ट्रेनवर एक नजर.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिली ५०८ किमी लांबीची हायस्पीड रेल्वे लाइन बनवत आहे, ज्यातील ३५२ किमीचा मार्ग गुजरातच्या नऊ जिल्ह्यांमधून आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातून जाणार आहे. या आठही जिल्ह्यांत प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या कॉरिडॉरमध्ये १२ स्थानके बांधली जात आहेत.