चिपळूण : शहरात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहिला आहे. या शिवपुतळ्याचे लोकार्पण रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व माजी पालकमंत्री तथा विद्यमान खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, तसेच शिवसृष्टी परिसर उभारण्याचे लोकार्पण नारायण तलाव सुशोभिकरण कामाचे लोकार्पण रविवारी होणार आहे.
या सोहोळ्याच्या निमित्ताने सायंकाळी चार वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेट्ये यांचे शिवरायांची स्मारके का उभारावीत, या विषयावर शिवव्याख्यान होईल, तर पुतळ्यासमोरील उभारण्यात आलेल्या स्टेजवर शिवशाही ते लोकशाही हा शाहीर रंगराव पाटील यांचा शाहीरी पोवाडा सादर होईल. या ऐतिहासिक सोहोळ्याला खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, आमदार राजन साळवी, सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे उपस्थित राहाणार आहेत.