
लांजा- मुंबई बोरिवली येथून मामाच्या गावी आली होती.तालुक्यातील आंजणारी मठ येथील काजळी नदीत एक हृदयद्रावक घटना घडली. नदीतील बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरल्याने १९ वर्षीय तरुणी अनुष्का अनिल चव्हाण (रा. कोडगे, ता. लांजा, सध्या मुंबई बोरिवली) हिचा नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आपल्या लांजा तालुक्यातील पुनस कोंड येथील मामाच्या गावी आली होती. आज शनिवारी ती मामाच्या मुलांसोबत आंजणारी येथील काजळी नदीकिनारी असलेल्या दत्त मंदिरात दर्शनासाठी गेली होती. रत्नागिरी एमआयडीसीने बांधलेल्या बंधाऱ्यावरून चालत पलीकडच्या दत्त मंदिरात जात असताना, तिचा पाय अचानक घसरला आणि ती नदीत पडली.
अनुष्काला पोहता येत नसल्याने, नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर ती सुमारे शंभर फूट वाहत गेली आणि पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.या दुर्दैवी घटनेमुळे पुनस कोंड आणि कोडगे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.