
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावर्डे येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वालोटी (ता. चिपळूण) येथील अजय अशोक सुतार (वय २५ ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, अजय सुतार हा आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होता. सावर्डे येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा त्याला अंदाज न आल्याने त्याची भरधाव दुचाकी थेट ट्रकवर मागून आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, अजय गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला व अजयच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. याप्रकरणी सावर्डे पोलिस अधिक तपास करत आहेत.