विवाहाऐवजी अंत्यसंस्कार करण्याची वेळ; हुतात्मा कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर…

Spread the love

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती.

आग्रा : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये शहरातील २७ वर्षीय कॅप्टन शुभम गुप्ता हुतात्मा झाले. त्यांच्या विवाहाची तयारी घरी सुरू होती. मात्र, त्याऐवजी आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ आल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

विवाहाऐवजी अंत्यसंस्कारांची तयारी; आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

‘कॅप्टन गुप्ता २०१५मध्ये लष्करात दाखल झाले होते आणि २०१८मध्ये ९ पॅरा स्पेशल फोर्समध्ये दाखल झाले. ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते, लवकरच त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठीचे नियोजनही घरी सुरू होते,’ असे कुटुंबीयांनी सांगितले. मुलगा घरी येईल आणि त्याचे लग्न होईल ही वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय आता त्यांच्या पार्थिवाची वाट बघत असल्याचे चित्र होते.

शुभम गुप्ता हुतात्मा झाल्याची बातमी आली आणि त्यांच्या आईची शुद्ध हरपली. त्यांचे वडील वसंत गुप्ता म्हणाले, ‘मी शुभमला लष्कराच्या गणवेशात बघायचो तेव्हा मला अभिमान वाटायचा.’ आग्र्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. बघेल यांनी शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

योगी आदित्यनाथ यांची श्रद्धांजली…

लखनौ : राजौरीतील घटनेत हुतात्मा झालेले जवान आणि कॅप्टन यांच्याप्रती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी मदत देण्याचे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. याशिवाय गुप्ता यांचे नाव एका रस्त्याला देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

राजौरीत लष्कराची दहशतवाद्यांसोबत चकमक, २ कॅप्टनसह चार जवान हुतात्मा

मेंगळुरूतील प्रांजल एनडीएचे माजी विद्यार्थी…

बेंगळुरू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले कॅप्टन एम. व्ही. प्रांजल यांचे पार्थिव गुरुवारी रात्री उशिरा येथे आणण्यात आले. ६३ राष्ट्रीय रायफल्सचे २९ वर्षीय कॅप्टन प्रांजल यांना राजौरीत वीरमरण आले. मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे (एमआरपीएल) निवृत्त संचालक एम. व्यंकटेश यांचा मुलगा प्रांजल यांनी शालेय शिक्षण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुरतकल येथे केले आणि नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून पुढील शिक्षण घेतले. बेंगळुरू शहराच्या बाहेरील अनेकल येथे प्रांजल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ‘एक्स’वर प्रांजल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page