लांजा l 23 एप्रिल- शहरात मुंबई गोवा महामार्गावर (वरचा पेट्रोल पंप) रेस्ट हाऊस या ठिकाणी उभ्या असणाऱ्या आयशर टेम्पो ने अचानक पेट घेतला आणि एकच गोंधळ उडाला. आज २२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ७.४५ वाजण्याच्या दरम्याने मुंबई गोवा महामार्गावर हा बर्निंग आयशर टेम्पोचा थरार पाहायला मिळाला. त्यानंतर तातडीने येथील नगरसेवक संजय यादव यांनी याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी व्यावसायिक नंदकुमार सूर्वे यांना दिली आणि त्यानंतर ते आपल्या पाण्याच्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे पुढील गंभीर प्रसंग टळला.
सोमवारी सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सोडण्यास राजापूरकडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एमएचझिरो आठ एपी 71 24 हा लोखंड घेऊन (स्टील) घेऊन राजापूरकडे चालला होता. लांजा रेस्ट हाऊस या ठिकाणी पेट्रोल पंपानजीक तो उभा होता. मात्र, अचानक या टेम्पोने पेट घेतला आणि हा हा म्हणता हा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
टेम्पोला आग लागल्याचे लक्षात येताच येथील हॉटेल व्यवसायिक आणि नगरसेवक संजय यादव यांनी प्रसंगावधान राखत कुवे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी व्यावसायिक नंदकुमार सुर्वे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नंदकुमार सुर्वे हे आपले पाण्याचे गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकही जमा झाले व लागलेली आग विझवण्यात आली. मात्र, या आगीत टेम्पो जळून जाऊन मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. टेम्पोला लागलेल्या आगीमुळे लांजा वासियांना बर्निंग आयशर टेम्पोचा थरार पहावयास मिळाला. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा नगरपंचायतीकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने पुन्हा एकदा यंत्रणेची किती आवश्यकता आहे हे दिसून आले.