वधूच्या रूममधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग केली लंपास…
सातारा- खंडाळा तालुक्यातील पारगावच्या हद्दीमधील मंगल कार्यालयात लग्न समारंभावेळी वधूच्या रूममधून चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली. यामधील दोन तोळे चौदा ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
भरदिवसा लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित चोरटा हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.याबाबतची घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पारगाव, ता. खंडाळा येथील एका नामांकित हाॅलमध्ये पुणे जिल्ह्यातील शिंद, ता. भोर, जि. पुणे येथील सुतार यांच्या मुलीचा व सातारा जिल्ह्यातील शामगाव, ता. कराड येथील धर्माधिकारी यांच्या मुलाचा लग्न समारंभ शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, हाॅलमधील वधूला देण्यात आलेल्या रुममध्ये एका बॅगेमध्ये नवरीमुलीचे मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल ठेवला होता. रूममध्ये वधूची आई साहित्य देवाण-घेवाण करण्याच्या गडबडीत असताना अज्ञात चोरट्यांने संधी साधत रूममध्ये प्रवेश केला. रूममधील रोख १७ हजार, ४८ हजारांची १२ ग्रॅमची सोन्याची चेन, २० हजारांचे अर्धा तोळ्याचे झुमके, वीस हजारांचे दोन सोन्याची कर्णफुले, वीस हजारांचे अर्धा तोळे सोन्याच्या दोन वाट्या, आठ हजारांच्या दोन सोन्याच्या नथ, पाच हजारांचा मोबाइल असा १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्याने लंपास केला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस अंमलदार सुरेश मोरे, जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.याबाबतची खबर सूरज सुतार यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली असून तपास पोलिस अंमलदार सुरेश मोरे करीत आहे.