देवरुख:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संगमेश्वर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते शिवसेनेत(शिंदे) येत असुन अजुन प्रतिक्षा यादीतील संख्या मोठी आहे असा दावा शिवसेना (शिंदे) तालुका प्रमुख प्रमोद पवार यानी केला आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंत यानी विकास कामांचा सपाटा लावला असून जिल्हा प्रमुख राहुल पंडित; उद्योजक किरण सामंत यानी सर्वच ठिकाणी जातीने लक्ष घालुन प्रत्येकाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे इतर पक्षातील कार्यकर्ते आमच्याकडे आकर्षित होत आहेत. आगामी काळात फार मोठ्या संख्येने विविध पक्षातील कार्यकर्ते आम्हाला जोडले जातील असा दावा श्री पवार यानी केला आहे.
आमच्या पक्षात येणा-या कार्यकर्त्याना मानाचे स्थान आम्ही देत असून त्यांच्या गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नुकतेच साडवलीच्या सदस्या सेजल जाधव यानी सेनेत प्रवेश केला; त्याच्याबरोबर साडवलीचे इतर काही सदस्याही संपर्कात आहेत; त्यानाही टप्प्या टप्प्याने प्रवेश दिला जाणार आहे असेही प्रमोद पवार यानी सांगितले.
देवरुख शहरातही शिवसेना(शिंदे) मजबुत झाली असुन तरुणांची मोठी फौज आमच्याकडे तयार झाली आहे. पालकमंत्र्यांच्या विकास कामांच्या धडाक्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या असुन या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यात प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचेही श्री प्रमोद पवार यानी सांगितले.
श्री पवार शेवटी म्हणाले की “आगामी काळात फार मोठ्या संख्येने इतर पक्षातील कार्यकर्ते आमच्याकडे येणार आहेत. इनकमिंग थांबणारच नाही. उलट त्याची गती वाढेल”