
मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर उद्या, बुधवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज हे स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दिलासा मानला जात आहे.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारची वैधता, आमदारांची अपात्रता आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष शिंदे गटाला बहाल करून टाकण्याचा निर्णय जाहीर केला. त्यास उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक आयोगानं एकतर्फी आणि पक्षपाती निर्णय दिला आहे, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला आहे.
ठाकरे यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केली होती. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे मूळ पक्षाची मालमत्ता ताब्यात घेत आहे. त्यामुळं या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्याची व संरक्षण देण्याची मागणी सिब्बल यांनी केली. सिब्बल यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर चंद्रचूड यांनी उद्या, बुधवारी दुपारी ३.३० वाजता सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
जाहिरात :

