२२ जानेवारी/अयोध्या: २२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, तर ती काळाच्या नवीन चक्राची उत्पत्ती आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. ते आता या दिव्य मंदिरात राहणार आहेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझा ठाम विश्वास आणि अपार श्रद्धा आहे की, जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांना नक्कीच होत आहे.
शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकानुशतके अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदान, त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभूरामांचे आगमन झाले आहे. या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना आणि तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. मी गर्भगृहात दैवी चैतन्याचा साक्षीदार बनूव तुमच्यासमोर उपस्थित आहे. सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण कंठ दाटून येतो, मन भरून आले आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. हा क्षण अलौकिक आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हे वातावरण, ह्या क्षणी आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये भगवान राम आहेत. संविधान अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून अनेक दशके कायदेशीर लढाई सुरूच होती. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.