
आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला…
पुणे: आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Governmant) मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे.
1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये
त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम
दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य पोलीस यंत्रणा सज्ज
आषाढी वारीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.