दहशतीच्या जोरावर कोकणात रिफायनरी लादली जाणार आहे का?गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचा सवाल
रत्नागिरी:-कोकणातील रिफायनरी संबंधात लेखन करणाऱ्या पत्रकाराचा रिफायनरी समर्थक असणाऱ्या व्यक्तीच्या गाडीखाली त्याच दिवशी अपघात होतो हे प्रकरण गंभीर असून पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या घातपात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे.
रिफायनरी विरोधात लेखन केलं म्हणून रिफायनरी समर्थकाच्याच गाडीने संबंधित पत्रकाराचा अपघात होणे हे केवळ संशयास्पद नसून गंभीर आहे.हा संपूर्ण प्रकार संतापजनक असून पत्रकारांचा आवाज दाबू पाहणाऱ्या प्रवृत्तीला कोण खतपाणी घालत आहे?याचा तपास ही एसआयटी मार्फत होणे गरजेचा आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांबाबत रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा कट रचला जातोय का?यादृष्टीने तपास होणे गरजेचे आहे.रिफायनरी समर्थकांकडून रिफायनरी विरोधकांवर दहशत दाखवून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का? याचीही चौकशी या निमित्ताने एसआयटी मार्फत व्हावी अशी मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने केली आहे.
जिथे नागरिकांचा तीव्र विरोध असणार नाही,अशा ठिकाणी कोकणात रिफायनरी करा, अशी भूमिका या आधीच गाव विकास समितीने राज्य शासनाकडे मांडली होती. कोकणात उद्योग आले पाहिजेत पण ज्या ठिकाणी लोकांचा तीव्र विरोध आहे तिथेच उद्योग करण्याचा हट्ट कशाला?जिथे विरोध होणार नाही अशी ठिकाणे बघून उद्योग आणले पाहिजेत.मागील 10 वर्षे नाणार येथील बहुसंख्य लोकांचा विरोध डावलून संघर्षाची स्थिती का निर्माण केली जाते? हे समजायला मार्ग नाही असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे .दहशतीच्या जोरावर कोणताही उद्योग कोकणात आणला जाणार आहे का? सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊन उद्योग व्यवसाय उभे राहिले पाहिजेत. तेथील नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली ठेवून मारामाऱ्या,गुंडगिरी असे प्रकार करून उद्योग व्यवसाय नेमके सामान्य माणसांसाठी आणले जातात की काही लोकांचं हीत जपण्यासाठी आणले जातात? असा प्रश्न आता निर्माण होत असल्याचे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.
जाहिरात :