
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या लगतची माती जोरदार पावसामुळे वाहून गेली आहे. यामुळे ही भिंत धोकादायक बनली असून, भिंत कोसळण्याचा धोका आहे.
दरवर्षी पावसाळ्यात परशुराम घाट डोकेदुखी ठरला असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेल्या उपाययोजना फोल ठरत आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यामध्ये परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळल्या. या पार्श्वभूमीवर घाटाच्या सुरक्षिततेसाठी गॅबियन वॉल व वरच्या बाजूला लोखंडी जाळी लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी कोट्यवधीची निविदा काढण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसात गेले चार महिने हे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, अवकाळी पावसामुळे हे काम अर्धवटच झाले आहे.
घाटाच्या खाली बांधलेल्या गॅबियन वॉलची माती पहिल्याच अवकाळी पावसात वाहून गेली होती. आता पुन्हा एकदा गॅबियन वॉललगतची माती जोरदार पाऊस व डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे वाहून गेली असून या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परशुराम घाट राष्ट्रीय महामार्ग विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे .