रांगोळ्या, गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत पहिल्याच दिवशी मिळाली नवीकोरी पुस्तके
ठाणे – रांगोळया, गुलाबपुष्प, गोड पदार्थ आणि चॉकलेट देत प्रवेश दिंडी काढून शाळेच्या पहिल्या दिवशी ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी केले. अत्यंत भारलेल्या अशा वातावरणात विद्यार्थ्यांनीही शिक्षकांकडून स्वागत स्वीकारुन शाळेचा प्रवेशोत्सव साजरा केला.
ठाणे महानगरपालिका शाळांची सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाची सुरूवात दमदार, उत्साहवर्धक करण्यासाठी ठामपाच्या सर्व शाळांना शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थी उत्साहात शाळेत यावे व शाळेमध्ये देखील चैतन्याचे, उत्साहवर्धक वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीकोरी पाठ्यपुस्तके मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
शाळेत प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्यात आला. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवी कोरी पाठ्यपुस्तके मिळाल्याने त्यांच्या आनंदात आणखीनच भर पडली. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 136 शाळांमधून अंदाजे 33006 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सरासरी 66% विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी परिसरातील मान्यवर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी नमूद केले.
ठाणे महापालिकेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.