
देवरूख- राष्ट्रसेविका समिती, दक्षिण रत्नागिरीच्या ५ दिवसाच्या निवासी प्रारंभिक वर्गाचा सांगता श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुख येथे उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वर्गामध्ये दक्षिण व उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून ५८ बालिका सहभागी झाल्या होत्या. या वर्गाची मध्यवर्ती कल्पना “जय जननी जय पुण्य धरा” ही होती. मुलींच्या सदगुणांचा विकास होण्यासाठी, तसेच मन आणि मनगटाचा कणखरपणा वाढावा हा प्रमुख उद्देश या वर्गाच्या आयोजनाचा होता. या निवासी वर्गामध्ये मनगटाच्या बळकटपणासाठी काठी, लेझीम, यष्टि, योगासने इ. प्रकारांबरोबर मन:शक्तीच्या वाढीसाठी विविध महत्वपूर्ण विषयांवरील चर्चासत्र व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले होते.
प्राथमिक वर्गाचे उद्घाटन राष्ट्रसेविका समितीच्या वर्गाधिकारी सुनंदाताई आमशेकर, गोवा यांच्या हस्ते संपन्न झाला. या वर्गामध्ये विविध खेळ व कार्यशाळा, बौद्धिक चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक व्यायाम, स्वसंरक्षण, मनोरंजन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कागदी फुले, आकर्षक चित्रे, रांगोळी अशा कलाकृतींची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. देशभक्तीपर समूहगीते, प्रार्थना व श्लोक, योगासने व सूर्यनमस्कार, पारंपारिक बैठे व मैदानी खेळ प्रात्यक्षिकांसह शिकविण्यात आले. या वर्गामधील बौद्धिक सत्रात सुनंदाताई आमशेकर, उमाताई दांडेकर, श्रेयाताई सरदेशपांडे, दिपालीताई कशेळकर, स्मिताताई आंबेकर यांनी व्याख्यानातून उद्बोधन केले. कागदी फुलांचे, रांगोळी, चित्रकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण अनुक्रमे सेजल वास्कर, सोनाली सुर्वे, तृप्ती सावंत व नयन शिंदे यांनी दिले.
प्राथमिक वर्गासाठी राधिका गानू(मुख्य शिक्षिका), रिद्धी धामणे(सहशिक्षिका), पूर्वा चौगुले, साक्षी शिंदे, तन्वी परांजपे यांनी प्रशिक्षण दिले. रत्नागिरी, राजापूर व संगमेश्वर तालुक्याच्यावतीने वंदे मातरम, अहिल्याबाई होळकर, समितीचे सण व उत्सव या विषयांवर आधारित प्रत्येक दिवशीच्या बौद्धिक विषयाच्या अनुषंगाने प्रदर्शनी मांडण्यात आली होती. प्रत्येक दिवशी नाविन्यपूर्ण कोपरा सजावट करण्यात आली. प्रारंभिक वर्गातील सहभागी बालिकांनी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कलादालन, शहीद स्मारक, परमवीरचक्र दालन आणि सृजन सायन्स सेंटर येथे भेट देऊन, माहिती जाणून घेतली. प्रारंभिक वर्गाचा समारोप स्मिताताई आंबेकर(प्रांत निधी प्रमुख) यांच्या व्याख्यानाने झाला. उपस्थितांचे स्वागत नगर शाखा कार्यवाहीका सुमनताई हेबाळकर यांनी केले, तर अहवाल वाचन वर्गाधिकारी सुनंदाताई आमशेकर यांनी केले. यावेळी वर्गार्थि मुलींनी सूर्यनमस्कार, दंड, लेझीम व योगासने यांची प्रात्यक्षिके सादर केली. हा वर्ग उत्तम प्रकारे यशस्वी करण्यासाठी देवरुख परिसरातील बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले.
फोटो: प्रारंभिक वर्गाच्या समारोप कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी आणि उपस्थित सहभागी वर्ग.