
मुंबई, 8 मे 2023- बदलत्या वातावरणामुळे मुंबईकर अक्षरश: हैराण झाले आहेत. कधी तापमान अचानक वाढते तर कधी अचानक घटते. मागच्या महिन्यात तर कमाल तापमानाने चाळीशी पार केली होती. रविवारी (७ मे ला) राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये वीजा, मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी बळीराजाचे कंबरडे मोडणाऱ्या गारा पडल्या आहेत. शहरीकरणाचे, प्रदूषणाचे हे परिणाम भोगण्यावाचून नागरिकांच्या हातात काही नाही. तरीही या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून मिळालेली माहिती दिलासादायक ठरणार आहे.
१८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आलेल्या तौक्ते तुफानाने देशातल्या अनेक भागांचे लक्षणीय नुकसान केले होते. त्या सारखेच आणखी एक तुफान लवकरच भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ हळूहळू विकसित होत आहे. या वादळाचे स्वरूप पूर्वीच्या इतर वादळांसारखे भीषण असेल की नसेल याचा अंदाज या घडीला लावणे शक्य नाही.
तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडीसासारख्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रीष्मकाळातल्या या चक्रीवादळाला ‘मोका’ हे नाव देण्यात आले आहे. याचा मार्ग आणि तीव्रता सध्या अनाकलनीय आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली. या वातावरणीय स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या वादळाचे पडसाद मुंबईवर सुद्धा उमटणार आहे. पुढील काही दिवस मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण राहाणार आहे. आद्रतेमुळे थोडा उकाडा जाणवणार असला तरी कमाल तापमान ३५ ते ३६ अंशाच्या वर जाणार नाही. त्यामुळे निश्चितपणे उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळेल.