श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा ने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची मासिक सभेत ज्येष्ठ नागरिकांनी केली प्रशंसा

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा ने जिल्हा परिषद सेवा निवृत्तांच्या विलंबाने होणाऱ्या पेन्शन प्रश्नाला वाचा फोडल्याने आता रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून वेळेत पेन्शन अदा केली जात आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा च्या या प्रशंसनीय कार्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. दिनांक 12 जुलै रोजी राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांना परिपत्रक जारी केले असून रत्नागिरी प्रमाणेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वेळेत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाने वाचा फोडलेला हा वेळेत पेन्शन वितरित करण्याचा “रत्नागिरी पॅटर्न* आता राज्यभरात लागू झाला आहे.
रत्नागिरीतील श्रीराम मंदिर कट्टाच्या वेळेत पेन्शन मिळण्यासाठी दिलेल्या लढ्याचा राज्यभरातील जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. त्यांनाही आता राज्यभरात पेन्शन योग्य वेळेत मिळणार आहे, याबाबत श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या १५ जुलै रोजी झालेल्या मासिक सभेत समाधान व्यक्त करण्यात आले.
रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा ची मासिक सभा दिनांक 15 जुलै रोजी संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने झाली. यावेळी श्रीराम मंदिर संस्थेचे विश्वस्त संतोष रेडीज, नित्यानंद दळवी, प्राचार्य प्रताप सावंत देसाई, मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये, सचिव सुरेंद्र घुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा तर्फे गेल्या दोन-तीन महिन्यात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात जिल्हा परिषद सेवा निवृत्तांच्या प्रश्नाला फोडलेली वाचा, भजनी कलावंतांना शास्त्रोक्त भजनी प्रशिक्षण, जेष्ठ नागरिकांची धार्मिक स्थळ दर्शन सहल, कलावंतांना समाज कल्याण खात्यातर्फे शासकीय मानधन मंजुरी अशा विविध कामांची प्रशंसा करण्यात आली.
जुलै महिन्यात वाढदिवस असणारे ज्येष्ठ नागरिक डॉक्टर दिलीप पाखरे,7 नागेश शंकर बंडबे, किशोर गोपाळ भुते, श्रीमती सुनेत्रा शेटे, श्रीमती दामले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य रमाकांत पांचाळ यांनी धार्मिक स्थळ दर्शन सहलीच्या खर्चाचा तपशील सादर केला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या सभेला आणि उपक्रमानां ज्येष्ठांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याबद्दल डॉक्टर दिलीप पाखरे यांनी अध्यक्षीय भाषणात समाधान व्यक्त केले आणि अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. कट्ट्याची पुढील मासिक बैठक दिनांक 19 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय झाला. शेवटी श्री सुरेंद्र घुडे यांनी आभार प्रदर्शन केले.