ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पंतप्रधानांनी घेतली भारतीय खेळाडूंची भेट…

Spread the love

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कॅनबेराला पोहोचली आहे. जिथं त्यांना 30 नोव्हेंबरपासून पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध 2 दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे.

कॅनबेरा  : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पहिल्याच सामन्यात त्यांनी शानदार विजय मिळवला. पर्थ कसोटी जिंकून भारतीय संघानं कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला आता पुढील कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळायची आहे, मात्र त्याआधी हा संघ 30 नोव्हेंबरपासून या सामन्याच्या तयारीसाठी दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सामना पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध होणार आहे. परिणामी या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली आहे. कॅनबेरा इथं झालेल्या या बैठकीत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला पाहून ते खूप उत्साहित झाले.

बुमराह-विराटचे फॅन आहेत अल्बानीज…

अँथनी अल्बानीज यांनी भारतीय खेळाडूंची अतिशय प्रेमळपणे भेट घेतली. त्यांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं आणि काही वेळ विराट कोहलीशीही बोलताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा संघातील सर्व खेळाडूंशी त्यांची ओळख करुन देत होता. आर अश्विन, रवींद्र जडेजा यांनीही ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली. अँथनी अल्बानीज हे गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचे भारतासोबत विशेष संबंध आहेत.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केली पोस्ट…

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी सोशल मीडियावर लिहिलं की, ‘या आठवड्यात मनुका ओव्हलवर प्राईम मिनिस्टर इलेव्हनला एका शानदार भारतीय संघाचं मोठं आव्हान असेल.’ जॅक एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील प्राईम मिनिस्टर इलेव्हननं अल्बानीज यांचीही भेट घेतली. क्रिकेट डिप्लोमसी हा भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक भाग आहे. अल्बानीज यांनी गेल्या वर्षी भारताच्या अधिकृत भेटीदरम्यान, त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत, अहमदाबाद इथं कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेतली.

दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये होणार :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल जो गुलाबी चेंडूनं खेळला जाईल. या सामन्यासह ऑस्ट्रेलियाला मालिकेत पुनरागमनाचे वेध लागले आहेत. त्यामुळंच ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी आणि फलंदाज दोन्ही मजबूत व्हाव्यात यासाठी संघाने ब्यू वेबस्टरसारख्या खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page