नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत भारत मंडपम याठिकाणी मागील दोन दिवसापासून जी २० शिखर परिषद सुरू होती. जगभरातील दिग्गज नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, दिल्ली जाहीरनामाही प्रसिद्ध झाला.
आर्थिक, व्यावसायिक, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आदी मुद्द्यांवरून विविध देशांनी विचारांची देवाण-घेवाण झाली. दोन दिवस चाललेल्या बैठकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समारोप केला आहे.
जी २० च्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना , नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी २० चं अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यानंतर, हे अध्यक्षपद दुसऱ्या देशाकडे देण्यात येणार आहे. त्याबाबतही मोदींनी मोठी घोषणा केली आहे.
याविषयी बोलताना मोदींनी, "भारताकडे नोव्हेंबरपर्यंत जी २० चे अध्यक्षपद आहे. यासाठी अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसांत आपण सर्वांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव मांडले आहेत. प्राप्त झालेल्या सुचनांवर आमच्याकडून विचार करण्यात येईल, ही आमची जबाबदारी आहे. नोव्हेंबरच्या शेवटी जी २० चं एक व्हर्चुअल सेशन ठेवलं जाईल. या सेशनमध्ये दोन दिवसीय शिबिरात झालेल्या मुद्द्यांची समिक्षा केली जाईल. तुम्ही या व्हर्च्युअल सत्रांत सहभागी व्हाल अशी आशा करतो. यासह, मी जी २० शिखर परिषदेचा समारोप घोषित करतो." अशी घोषणा केली.
ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत जी २० च्या अध्यक्षपदाचं गेवल (प्रातिनिधिक चिन्ह) नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलं. म्हणजेच, नोव्हेंबर २०२३ नंतर जी २० चं अध्यक्षपद ब्राझिलकडे असणार आहे. दरम्यान, जी २० चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लुला दा सिल्वा यांनी ,"ब्राझीलच्या अध्यक्षपदाची तीन प्राधान्ये आहेत, सामाजिक समावेश - उपासमार विरुद्ध लढा, ऊर्जा संक्रमण - शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा." म्हटले आहे.