नागपूर : आज येईल उद्या येईल म्हणून पावसाकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. मात्र, मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तिथे पेरण्या झाल्या. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचं संकट आलेलं आहे. एकूणच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. नागपुरात तर भाजीपाल्याची किंमत दुप्पटीने वाढली आहे. एकट्या फरसबीलाच मच्छीचा भाव आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहेत. महागाईने डोकं वर काढल्याने सांगा कसं जगायचं? असा सवाल सामान्य नागरिक विचारताना दिसत आहे.
मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. नागपुरात भाज्यांच्या दरात दुप्पटीनं वाढ झाली आहे. नागपूरच्या भाजी मार्केटमध्ये सध्या फरसबी ३२० किलो रुपयाने विकली जात आहे. सिमला मिर्ची १६० रुपये किलो झाली आहे. किरकोळ बाजारात वांगी ८० रुपये, मेथी १६० रुपये, गवार शेंगा १२० रुपये, भेंडी ८० रुपये, ढेमुस १२० रुपये आणि कोथिंबीर १६० रुपये किलोवर गेली आहे. लांबलेला पाऊस आणि वाढत्या उकाड्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची दरवाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. बाजारात आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती, भाजी विक्रेते अमित मुळेवार यांनी दिली आहे.
मुंबईतील भाजीपाल्यांचे दर काय?
मे महिन्यात तर भाज्यांचे घाऊक दर निम्म्यावर आले होते. नागरिक मोठ्या संख्येने गावी, परगावी गेल्याने भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र आता मुंबईकर परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र मागणी वाढलेली असतानाच पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत भाजीपाल्यांचे दर दुप्पट वाढलेले दिसत होते.
फरसबी : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ४० ते ६०
गवार : सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ६०
घेवडा : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ६०
नाशिकमधील दर काय?
जून महिना अर्धा सरला तरी अद्याप देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम शेती पिकांच्या उत्पादनावर होत असून कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाल्यांची आवक घटली आहे.
यामुळे कोथंबीर, मेथी, शेपू, कांदापात, मिरची अशा भाजीपाल्यांचे दर वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोथिंबीर ७० ते ८० रुपये, मेथी २५ ते ३० रुपये, मिरची ५० ते ७० रुपये किलोने विकली जात आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे.