उल्हासनगर महापालिकेत सत्तासंघर्षाला वेग; शिवसेना शिंदे गटामार्फत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू…

Spread the love

बहुमतापासून अवघ्या एका पावलावर थांबलेल्या भाजपसमोर आव्हान उभे राहत असतानाच, शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्तास्थापनेसाठी आक्रमक हालचाली सुरू केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उल्हासनगर महापालिकेत सत्तासंघर्षाला वेग; शिवसेना शिंदे गटामार्फत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू…

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या निकालानंतर काही काळ शहरात विजयाचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांचा आवाज घुमत राहिला. मात्र हा जल्लोष ओसरताच उल्हासनगरच्या राजकारणात खरी ‘रात्रीची खेळी’ सुरू झाली. बहुमतापासून अवघ्या एका पावलावर थांबलेल्या भाजपसमोर आव्हान उभे राहत असतानाच, शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्तास्थापनेसाठी आक्रमक हालचाली सुरू केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

७८ सदस्यांच्या महापालिकेत भाजप ३७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यात भाजप एका जागेने कमी पडला. शिवसेनेच्या शिंदे गटाला ३६ जागा मिळाल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीला २, काँग्रेसला १, साई पक्षाला १ आणि एका अपक्ष उमेदवाराला विजय मिळाल्याने महापालिकेतील सत्तेचा कौल या छोट्या घटकांच्या हातात गेला आहे. परिणामी प्रत्येक भेट, प्रत्येक फोन आणि प्रत्येक चर्चा निर्णायक ठरत आहे.

याच पार्श्वभूमीवर निकालानंतर विजयाचा जल्लोष संपताच मध्यरात्री उल्हासनगरमधील शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची घटना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीने उल्हासनगरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, ही केवळ अभिनंदनपर भेट नसून सत्तासमीकरणांची जुळवाजुळव असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

छोट्या घटक पक्षांना महत्व…

भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्तास्थापनेसाठी त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे, शिंदे गटानेही ‘एक जागा कमी’ या वास्तवावर मात करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, साई पक्ष आणि अपक्ष यांच्याशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ‘किंगमेकर’ ठरणाऱ्या या छोट्या घटकांची राजकीय किमत अचानक प्रचंड वाढली आहे. निकालानंतरचा आनंद आता सत्तास्थापनेच्या धावपळीत बदलला असून, उल्हासनगरचे राजकारण दिवसाइतकेच रात्रीही जागते आहे. महापालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार, अंतिम क्षणी कोण बाजी मारणार आणि कोणाला विरोधी बाकांवर बसावे लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत उल्हासनगरच्या राजकीय इतिहासात निर्णायक वळण येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाच पक्ष एकत्र, तरीही भाजप भारी…

उल्हासनगर महापालिका निवडणुकीचा निकाल म्हणजे केवळ विजय-पराभवाची आकडेवारी नव्हे, तर शहरातील बदलत्या राजकीय प्रवाहाचे ठळक प्रतिबिंब ठरला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने पाच पक्षांची आघाडी उभी केली आणि स्थानिक पातळीवर सर्व ताकद पणाला लावली; मात्र तरीही भाजपला रोखण्यात शिवसेनेसह सर्वच घटक पक्षांची दमछाक झाल्याचे चित्र अंतिम निकालातून स्पष्ट झाले आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टी ३७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना अवघ्या एका जागेच्या फरकाने मागे पडत ३६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेची सत्ता अद्याप अधांतरीच आहे. एकूणच उल्हासनगरचा कौल कोणालाही एकहाती सत्ता देणारा नसून, पुढील राजकारण आता सत्तास्थापनेच्या वाटाघाटी, तडजोडी आणि राजकीय डावपेचांवर अवलंबून राहणार आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page