
*मुंबई-* एप्रिल महिन्याच्या सुरूवातील राज्यातील नागरिक उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेले असतानाच आता हवामान विभागाने वेगळाच अंदाज वर्तवला आहे. काल राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाची हजेरी अनेक भागांत लागल्याने त्रेधातिरपीट उडाली होती. दरम्यान राज्यात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याला बुधवारी आणि गुरुवारी देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट देण्यात आला. तसेच गुरुवारी देखील यलो अलर्ट देण्यात आला असून शुक्रवारपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूरचा समावेश आहे. राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळला. याच पार्श्वभूमीवर पुढील 2 दिवसही महाराष्ट्रात विविध भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. घाट माथ्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठी अलर्ट रहावे आणि सज्ज रहावे अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.