मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांचे महापालिकेला निवेदन
दिवा ( प्रतिनिधी) दिवा पश्चिमेकडील ठामपा शाळा क्रमांक ७९/९८ मध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सदर शाळेतील प्रसाधन गृहांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना याचा त्रास सहन करावा लागतोय. प्रसाधन गृहातील मलनिस्सारण व्यवस्था सुस्थितीत नसल्याने शाळेतील प्रसाधन गृह अत्यंत गलिच्छ आणि किळसवाणी झालेले आहेत. संपूर्ण शाळेत त्याचा घाण वास पसरलेला असून ही परिस्थिती मुलांच्या आरोग्याला घातक ठरू शकते. तथा विदयार्थांचे भविष्यही अंधारात जाण्याची शक्यता आहे. याकरीता दिवा मनसेचे शहर अध्यक्ष श्री तुषार पाटील यांनी ही झालेली दयनीय अवस्था सुधारण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला निवेदन दिले आहे.
सदर शाळेतील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून त्याच परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत. या फुटलेल्या काचांमुळे भविष्यात एखादा अपघात घडू शकतो. सोबतच बहुतांश वर्गातील वर्गातील फळे हे देखील फुटलेल्या अवस्थेत आहेत,ज्यामुळे शिक्षकांना मुलांना शिकवण्यात अडचणी येत आहेत. या सर्व विषयावर शाळेकडूनही याबाबतीत प्रभाग समितीला पत्रव्यवहार करण्यात आला होता.मात्र त्यावर अजूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
या शाळेची पटसंख्या ही अत्यंत चांगली असून, इथल्या शिक्षकांनी मुलांसाठी घेतलेल्या मेहनातीमुळे शाळेने राष्ट्रीय आणि महापालिका स्तरावर पारितोषिकेही जिंकलेली आहेत हे तुषार पाटील यांनी पत्रातून लक्षात आणून दिले. एका बाजूला सरकारी शाळांबाबत सर्व स्तरांवर अनास्था असताना येथील शिक्षकांनी मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे असून त्याला सरकारी पातळीवरून थोडासा पाठिंबा मिळाल्यास शिक्षकांच्या प्रयत्नांना अजून बळ मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान शाळेच्या झालेल्या दुरावस्थेबाबत मनसेतर्फे दिवा प्रभाग समितीला निवेदन देण्यात आले असून मुलांचे भविष्य लक्षात घेता पालिकेकडून काय उपाय योजना केल्या जाणार आहेत हे पहावे लागणार आहे.