लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर कुडाळच्या जनतेला द्यावे

Spread the love

▪️भाजप नगरसेविका चांदणी कांबळी यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांना आव्हान

कुडाळ/प्रतिनिधी:- नगरपंचायतीच्या मागील वर्षभराच्या कारभाराबाबत भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या वर्षभरात झालेल्या घोटाळे आणि भ्रष्टाचारांची मालिका सुरू केल्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या बिघडलेल्या मनस्थितीमुळे भाजपच्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी सुरू केली आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीवरून सत्ताधारी नगरसेवकांची मानसिकता ढासळलेली दिसून येत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका चांदणी कांबळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी बालोद्यानाचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या म्हणजेच राजकीय पक्षाच्यावतीने केले. या बालोद्यानांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून याबाबत नगरसेविका संध्या तेरसे यांनी आरोप केले होते. तसेच कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेमध्ये झालेला घोटाळा याबाबत गटनेता विलास कुडाळकर यांनी आवाज उठवला होता. सत्ताधाऱ्यांवर केलेल्या या आरोपांचे खंडन सत्ताधाऱ्यांनी केले नाही किंवा त्याबाबत जनतेला स्पष्टीकरणही दिले नाही. २७ लाखात दुमजली प्रशासकीय इमारती उभी राहतात. परंतु, केवळ एक घसरगुंडी २७ लाखांची बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जनता ओळखून आहे. जनता खूप सुज्ञ आहे हे काँग्रेस आणि ठाकरे सेनेने ध्यानात ठेवावे सत्ताधारांच्या या भ्रष्टाचाराची चर्चा कुडाळ शहरात झाल्याने या भ्रष्टाचाराची चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी आणि जनतेचा लक्ष विचलित करण्यासाठी कुडाळ नगराध्यक्ष आफरीन करोल आणि सत्ताधारी नगरसेवकांनी जाणून बुजून स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांच्याविरोधात पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी यांच्याजवळ तक्रारींची निवेदने दिली आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारांनी सुरू केला आहे. मात्र, या त्यांच्या प्रयत्नाला भाजपचे नगरसेवक जुमानणार नाहीत अजूनही काही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आमच्या हाती अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणी लागली आहेत. गेल्या एक वर्षांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढल्याशिवाय भाजपचे नगरसेवक राहणार नाहीत. मग कितीही दबाव सत्ताधाऱ्यांनी आणला तरी बेहत्तर पण आता मागे हटणार नाही. असे नगरसेविका चांदणी कांबळी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या दोन्ही नगरसेविकांना गणेश भोगटे यांची मदत

कुडाळ नगरपंचायतीच्या २०२१-२२ मध्ये झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गणेश भोगटे यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती आणि या दोन्ही नगरसेविकांना काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. इतर ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. मात्र, गणेश भोगटे यांनी मदत केलेल्या दोन्ही नगरसेविका निवडून आल्या. मात्र, आता नगराध्यक्ष आफरीन करोल या त्यांनी केलेल्या मदतीला विसरून नगराध्यक्ष पदाच्या धुंदीत आणि सत्तेचा माज त्यांना चढला आहे. असे नगरसेविका चांदणी कांबळी यांनी सांगितले.

नगराध्यक्ष कर्मचाऱ्यांचा करतात अपमान ते चालतं का?

नगरपंचायत कार्यालयामध्ये वावरत असताना नगराध्यक्ष आफरीन करोल यांना वाटते की, आयुष्यभरासाठी नगराध्यक्ष पद आपल्याकडेच आहे नगराध्यक्ष पदाचा गैरवापर करत कर्मचाऱ्यांवर अरेरावी करणे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वयाचा ही विचार न करता त्यांच्याशी अरे तूरे मोठ्या आवाजामध्ये बोलणे अधिकाऱ्यांना स्वतःचे काम करण्यासाठी जेवणाच्या डब्यावरून उठवणे आणि त्यांनी काम न केल्यास त्यांच्या विरोधात काम करत नाही म्हणून मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी करणे हेच काम नगराध्यक्षा गेली १ वर्ष करत आहेत. नगरसेवक अंगावर धावून आल्याची खोटी तक्रार करत महिला असल्याचा गैरफायदा नगराध्यक्षा घेत आहेत. उपस्थित सगळ्यांनी पाहिले आहे. गणेश भोगटे हे आपल्या जागेवर उभे राहून बोलत असताना खोटे आरोप करून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा महिलांमुळेच ज्या खऱ्याच अशा प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत त्या महिलांना न्याय मिळत नाही. ही कुडाळेश्वराची कुडाळनगरी आहे इथे खोटे वागणाऱ्यांची डाळ शिजत नाही, असे प्रसिद्धीपत्रकात नगरसेविका चांदणी कांबळी यांनी म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page