ठाण्यात एकच चर्चा, नितीन देसाईंचा ‘परमार’ झाला का ? अनेकांनी थकवली होती बिले

Spread the love

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. ठाण्यात त्यांनी काही प्रोजेक्ट उभारले होते. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप असून त्यांची चोकशीही सुरू आहे. त्यांची बिले अनेकांनी थकवली होती. त्यामुळे देसाईंचा ‘परमार’ झाला का अशी ठाण्यात चर्चा आहे. परमार हे इथले मोठे बिल्डर होते त्यांनीही आत्महत्या केली होती. 

ठाणे ; प्रतिनिधी (निलेश घाग) नितीन देसाई अर्थात NDA यांनी आपल्या खासगी कंपनीमार्फत ठाण्यात अनेक प्रकल्प हाती घेतले होते. त्यात प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका हद्दीत ‘नवीन ठाणे जुने ठाणे’ तसेच ‘बॉलीवूड पार्क’ आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये त्यांना अपयश आले. परंतु या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न खूप गाजला आजही त्या कामातील गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. पालिकेचे अभियंते रोहित गुप्ता यांनी ही माहिती आमच्या दबावच्या प्रतिनिधीला दिली आहे.

ठाणे महानगरपालिकेचे बडे अधिकारी आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या संगनमताने उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. काही नगरसेवकांनी ‘ए.न.डी’कंपनीचे बिल रोखवण्यात यावे अशी मागणी करून देसाई यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती, असे सांगितले जाते. या सर्व घटना क्रमामुळेच नितीन देसाई कर्जबाजारी झाल्याने त्यांचा ‘सुरज परमार’ झाला अशी जोरदार चर्चा सध्या ठाण्यात सुरू झाली आहे. परमार ठाण्यातील मोठे बिल्डर होते. त्यांनीही आत्महत्या केली होती, आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही नगरसेवकांसह नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

ठाणे हे ऐतिहासिक शहर असून त्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ठाणे महापालिकेने घोडबंदर रोडवर १६ कोटी हून अधिक रक्कम खर्च करून ‘जुने ठाणे-नवे ठाणे’ हे थीम पार्क उभारले होते व त्याचे काम निष्णात कलादिग्दर्शक असलेल्या नितीन देसाई यांना देण्यात आले होते. ठाण्याचा इतिहास आबालवृद्धांपर्यंत सर्वांना कळावा यासाठी येथील पार्कची उभारणी करण्यात आली होती.

सदर प्रकल्पाचे उद्घाटन एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आले होते. परंतु ह्या थीम पार्कमध्ये उभारलेल्या ट्रेनसाठी १ कोटी ६५ लाख, शिवाजी महाराजांच्या आठ फुटी पुतळ्यासाठी ८० लाख, घोडबंदर किल्ल्याच्या प्रतिकृती साठी ७९ लाख तर केवळ जामीन खोदण्यासाठीच तब्बल पाच कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने वादंग माजला होता. एवढा खर्च करून देखील उद्यानाची काही दिवसातच धुळधाण झाली व केवळ एका पावसाळ्यात जुने ठाणे-नवे ठाणे पार्कची वाताहात झाली.

तलावात साचलेल्या शेवाळाने या उद्यानाच्या दर्जाबद्दल सर्वांच्या मनात साशंकता निर्माण झाली. या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपयांची बिले NDA अर्थात नितीन चंद्रकांत देसाई यांच्या नावे अदा केली गेली होती व त्यातील एक कोटी रुपये रोखण्यात आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली व त्याचा अंतिम अहवाल येऊन देखील कोणावरही कारवाई झाली नाही.

सदर थीम पार्कच्या घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात चर्चेसाठी आणल्याने तत्कालीन पालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये मोठा वादंग निर्माण झाला होता. आता NDA यांच्या मृत्युमुळे पुन्हा एकदा सुरज परमार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून या प्रकरणात तरी कोणी दोषी सापडतात का हे पाहावे लागेल.

ठाण्यातील थीम पार्कच्या घोटाळा प्रकरणांमध्ये अजूनही चौकशी सुरूच असल्याचे पालिकेचे अभियंते रोहित गुप्ता यांनी सांगितले. एकीकडे नितीन देसाई यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांनी केलेल्या ठाण्यातल्या प्रकल्पाची चौकशी मात्र अजूनही सुरूच आहे आता या थीम पार्कची दुरावस्था देखील मोठ्या प्रमाणात झाली असून कोविड नंतर या थीम पार्क दुरुस्तीसाठी विशेष निधी देण्यात आलेला होता आता मेट्रोच्या कामामुळे या पार्कची आणखीनही मोठी दुरावस्था झालेली आहे. ही चौकशी आणखीन किती दिवस चालणार की बासनात गुंडाळण्यात येणार हे भविष्यात पाहायला मिळेल.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page