रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आरोप.

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०२, २०२३.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला, असा आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शिंदे-भाजप सरकारनं परवानग्या दिल्यानं प्रकल्पाला गती आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी २.४१ लाख कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली. यात हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅकवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना वेगवेगळ्या प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली.