
चिपळूण/दि २२ एप्रिल- संगमेश्वर तालुक्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कसबा गावात उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार लवकरच कसबा-संगमेश्वर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे स्मारकाच्या कामाला आवश्यक त्या शासकीय मंजुरी व निधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.
या पार्श्वभूमीवर चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी आज स्वतः कसबा येथे स्मारकाच्या नियोजित जागेची सखोल पाहणी केली. त्यांनी कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, आणि कसब्यातील इतर पुरातन मंदिरांनाही भेट दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत संपूर्ण दौऱ्याचे काटेकोर नियोजन सुसूत्रतेने उभे केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा हा केवळ स्मारकापुरता मर्यादित नसून, त्यातून संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना, स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा दौरा म्हणजे एक सकारात्मक टप्पा असून, स्मारक हे केवळ इतिहासाची आठवण न राहता युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंटकर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनोद म्हस्के, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मज्जित भाई नेवरेकर, बाळ सर र्देसाई, सरपंच पूजा लहाने, निबंध कानिटकर, राजन कापडी, श्रीनिवास पेंडसे, तहसीलदार अमृता साबळे, बीडिओ भारत चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जाधव, पुरातन विभागाचे अधिकारी विलास बलसाठ, आर्किटेक योगेश कासारे, पाटील तसेच मुरलीधर बोरसुतकर, भाई पेंढारी, निकेत चव्हाण, राम शिंदे खालीद काजी, प्रवीण चव्हाण आदी ग्रामस्थ विविध खात्याचे अधिकारी, कार्यकर्ते व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची जाण, संस्कृतीची जाणीव आणि प्रेरणा देणारे ठरेल. हा दौरा स्मारकाच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, हे निश्चित. हा दौरा ऐतिहासिक ठरणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.