
नवी दिल्ली प्रतिनिधी- मागच्या काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेला तणाव आता निवळला असला तरी उद्या म्हणजेच २९ मे रोजी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यात पुन्हा एकदा मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर मध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यातही महत्वाची बाब म्हणजे ही मॉक ड्रिल संपूर्ण राज्यात घेतली जाणार नाही, तर फक्त सीमेला लागून असलेल्या भागातच घेण्यात येईल. सीमेवर राहणाऱ्या लोकांना युद्धसदृश परिस्थितीत काय करावे यासाठी हे मॉक ड्रिल घेण्यात येईल. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध मोठं काहीतरी घडणार का? या चर्चांना जोर आला आहे.
२७ मे रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटल होते कि, आता आपल्यासमोर जे आहे ते थेट युद्धासारखे आहे आणि त्यांना त्याच पद्धतीने उत्तर मिळेल. त्यानंतर आता उद्या सीमे लगतच्या भागात म्हणजेच पाकिस्तानच्या निशाण्यावर असलेल्या जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात मध्ये मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय सरकार कडून घेतला आहे. यासोबतच, हरियाणा सरकार सुद्धा २९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून संपूर्ण राज्यात “ऑपरेशन शील्ड” नावाचा एक मोठा नागरी संरक्षण सराव आयोजित करणार आहे. हा सराव राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाईल, ज्याचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तयारी आणि प्रतिसाद सुधारणे आहे.
यापूर्वी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले गेलेले असताना ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली होती. पण ६ आणि ७ मेच्या रात्रीच भारतीय सैन्यानं पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मॉक ड्रिलची घोषणा (Mock Drill On 29 May) झाल्यानं पुन्हा मोठं काही तरी घडणार का? अशी शंका निर्माण झाली आहे.
मॉक ड्रिल म्हणजे काय?..
मॉक ड्रिल (Mock Drill) म्हणजे आपत्कालीन परिस्थिती (emergency situation) किंवा आपत्ती (disaster) येण्यापूर्वी त्याचा सराव करणे. या सरावात सहभागी होणारे लोक आपत्तीच्या प्रसंगी काय करायचे, कसे वागावे, हे शिकतात
*मॉकड्रीलमध्ये नेमकं काय होणार?…*
हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार…
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार
सामान्य नागरिकांना बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार…
महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येणार…
रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये यासाठी ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्त्वं पटवून दिलं जाणार….