मुंबई- मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मुंबई आज मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रकडून धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरगाव चौपाटीवरुन शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला वंदन करुन या मोर्चाला सुरुवात झाली होती.
मराठा मोर्चा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडकणार होता. मात्र गिरगाव चौपाटीवरील सेल्फी पॉईंटवर पोलिसांनी मोर्चा अडवला. यापुढे मोर्चा जाऊ शकत नाही, असं स्पष्ट करत पोलिसांनी मोर्चेकरांना ताब्यात घेतलं. आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे. तसेच कायद्यात टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी मराठा समाजाची आहे. कालपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत होता. त्यानुसार, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रतर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला.
त्यानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता मोर्चा निघाल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त परिसरात ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते. देशातील सर्वात मोठी जात मराठा आहे, तिचे तुकडे होऊ देणार नाही. मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे. कोणतंही सरकार आलं तरी मराठा समाजाच्या भावनेशी खेळत आहे. मागील ४२ वर्षांपासून आम्हाला लटकवून ठेवलं आहे. आमचा हक्क आहे, ओबीसीमधून मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तेच संविधानिक होईल, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची आहे.