कर्जत | फेब्रुवारी २८, २०२४.
“विरोधी पक्षातील आमचे मित्र नेहमीच आरोप करतात, भाजपा ईव्हीएम मशीन हॅक करते त्यामुळे निवडणुका जिंकते. पण त्यांना भारतीय जनता पार्टीचे तंत्रच अजून समजले नाही हे मान्य करावे लागेल. भाजपा लोकांची मनं जिंकते आणि मग ते लोकंच भाजपाला भरभरून देतात. आमचे मार्गदर्शक श्रद्धेय अटलजी म्हणतात, “सरकार येईल, जाईल पण देश राहिला पाहिजे.” भाजपा कार्यकर्ते देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी झटतात. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी लोकं प्रभावित होतात हेच खरे. त्यामुळे घरांवर काढलेली कमळाची निशाणी लोकांच्या मनावर बिंबवणार… आता कमळ फुलवणार” असा निर्धार रत्नागिरीचे मा. आमदार, भाजपा नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सह-प्रभारी बाळ माने यांनी कर्जत येथे प्रवासादरम्यान व्यक्त केला.
क्लस्टर प्रवासासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत असताना कर्जत येथे एका भिंतीवर कमळाचे चिन्ह काढून ते रंगवताना तल्लीन झालेले बाळासाहेब माने लोकांनी पाहिले. नेत्यामध्ये असलेला उत्साही कार्यकर्ता यावेळी उपस्थितांनी पाहीला. आधी देश, नंतर पक्ष, शेवटी स्वतः ही विचारसरणी जोपासणाऱ्या या पक्षाची वाटचाल देशभरात २ खासदार ते ३०३ खासदार होण्यात अशा नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा वाटा किती महत्त्वाचा आहे हे या छोट्याशा कृतीतून दाखवून देण्यात बाळासाहेब माने यशस्वी ठरले.
यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे, प्रदेश सरचिटणीस श्री. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी श्री. अतुल काळसेकर, श्री. बाळासाहेब पाटील आदी मान्यवर पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.