
राजापूर: तालुक्यातील पाटवाडी देवाचे गोठणे येथे १२ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिलेला बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांचा पुतण्या पर्शुराम भिकाजी गुरव, त्याची पत्नी, प्रभात भिकाजी गुरव, तुळशिदास केरु गुरव, जयेश भिकाजी गुरव आणि भिकाजी बापू गुरव यांना त्यांच्यातील वाद मिटेपर्यंत बांधकाम करू नका, असे सांगितले होते. याचा राग आल्याने आरोपींनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तक्रारीनुसार, परशुराम गुरव याने फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून जात तिला धक्काबुक्की केली. महिलेने शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यावर प्रभात भिकाजी गुरव, तुळशिदास केरु गुरव आणि जयेश भिकाजी गुरव यांनीही तिला शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या भिकाजी बापू गुरव याने फिर्यादीला “तू इथून निघून जा नाहीतर तुला आम्ही मारून टाकू,” अशी धमकी दिली.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पुतण्या पर्शुराम भिकाजी गुरव, त्याची पत्नी, तुळशिदास केरु गुरव, जयेश भिकाजी गुरव आणि भिकाजी बापू गुरव (सर्व रा. देवाचे गोठणे, ता. राजापूर) यांनी अंगावर धावून येत धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
राजापूर पोलिसांनी या प्रकरणी पर्शुराम भिकाजी गुरव, आणखी एक अज्ञात आरोपी, प्रभात भिकाजी गुरव, तुळशिदास केरु गुरव, जयेश भिकाजी गुरव आणि भिकाजी बापू गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.